आमची उद्दिष्टे आणि उपक्रम :

‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यांच्यामधला ‘दुवा’ म्हणजेच ‘दुवा संकलन संवर्धन केंद्र’ हा दुवा जोडला जाण्यासाठी संस्था वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करते.संस्थेतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमधून संस्थेच्या उद्दीष्टांच्या दिशेनी होणारी आमची वाटचाल स्पष्ट होते.

 

स्वस्थ समाजाच्या केंद्रस्थानी असते ती सक्षम महिला. तिला आर्थिकदृष्ट्या सबल बनवून स्वत:ची ओळख निर्माण करायला मदत करणं हे संस्थेचं महत्त्वाचे उद्दीष्ट. त्यासाठी COVIDच्या कठीण काळात कुटुंबाला हातभार लावण्यासाठी अनेक मुली आणि महिला red dot bags बनवायला शिकल्या.

वापरलेले कपडे आणि साड्या यापासून ५२ वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मुळशी तालुक्यातल्या आणि पुण्यातल्या काही गरजू महिला बनवत आहेत. त्यांच्या विक्रीतून त्यांना अर्थार्जनाचा नवा मार्ग सापडला आहे.

 

अभिजात एज्युकेशन सोसायटीच्या ग. रा. पालकर प्रशालेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘दुवा’मार्फत प्रशिक्षित शिक्षकांकडून Spoken English चे तास घेतले जात आहेत. त्यामुळे केवळ इंग्रजी बोलण्याचे कौशल्य नाही म्हणून गुणी विद्यार्थी मागे पडणार नाहीत. उच्च शिक्षण आणि व्यावसायिक क्षेत्रात आत्मविश्वासाने पाऊल टाकण्याची संधी ‘दुवा – इंग्लिश संभाषण’ वर्गातून या मुलांना मिळत आहे.

तरुणांमधील तंत्रस्नेही कौशल्याचा वापर करून ज्येष्ठ नागरिकांनाही तंत्रज्ञान स्नेही करण्याचा अभिनव उपक्रम ‘दुवा’ने हाती घेतला. कॉलेजमधील विद्यार्थी मोकळ्या वेळात आजी-आजोबांचे ‘टेक्नो-भिडू’ बनले आणि मोबाईल,laptop हाताळताना येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना चुटकीसरशी मिळवून दिली. त्यातून आजी-आजोबाही नवीन तंत्रज्ञान लिलया हाताळू लागले.

 

निरोगी स्त्री हा निरोगी कुटुंबाचा कणा म्हणूनच स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेणं हे दुवाचं महत्त्वाचं उद्दीष्ट. त्यासाठी महिला दिनाच्या निमित्ताने ‘सुतारदरा’, पौड रस्ता या वस्ती विभागातील ५० घरेलू कामगार महिलांच्या रक्ताची तपासणी करून व आहार तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही देण्यात आलं. कमीतकमी खर्चात स्वत:साठी आणि कुटुंबासाठी आरोग्यपूर्ण आहार कसा बनवता येईल यासंबंधीचं मार्गदर्शनही महिलांना दिलं गेलं.

 

व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन लवकरात लवकर पायावर उभं रहाता यावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते म्हणूनच ‘दुवा’ने कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मणिलाल नानावटी कॉलेजमधील ३ विद्यार्थिनींची शिवणकाम वर्गाची फी भरून त्यांना व्यवसाय प्रशिक्षण घेण्यास मदत गेले.

काही गरजू विद्यार्थ्यांना स्वत: खराटे बनवून त्यांची विक्री करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

 

पर्यावरण संवर्धन ही आजच्या काळाची गरज आहे, म्हणून ‘दुवा’तर्फे प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी ‘सहवर्धन’ गटाच्या माध्यमातून नागरिकांना कापडी पिशव्या वाटण्यात आल्या.
लहानपणापासून पर्यावरण संवर्धनाची गोडी लागावी म्हणून ‘दुवा’च्या सहकार्याने ग. रा. पालकर शाळेतील विद्यार्थ्यांचे ‘पर्यावरण मंडळ’ स्थापन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी निसर्ग संवर्धन विषयक विविध उपक्रम राबवण्यात येत आहे.

 

शहरी भागातली एक प्रमुख समस्या म्हणजे घराघरातून निर्माण होणारा कचरा. ‘दुवा’तर्फे red dot bags च्य वापराबद्दल महिलांमध्ये जागृती निर्माण केली जाते.

तसंच घरगुती पातळीवर ओल्या कचऱ्यापासून खत बनवण्याचं मार्गदर्शनही ‘दुवा’च्या माध्यमातून केलं जातं.